स्त्रीवादी चळवळींची सुरुवात युरोपात ‘लैंगिक समानते’च्या जाणीवेतून झाली आणि मग व्यापक होत ‘स्त्रीहक्का’च्या मागणीपर्यंत येऊन ही चळवळ स्थिरावली. या वाटचालीत खाचखळगे उंचवटे तर येतच राहिले पण अनेक वाटा फुटल्या आणि कोणत्याही वाटेने गेले तरी ही वाट कशी चुकली हे सांगणारे होतेच. मुळातच ‘फेमिनिझम’ शब्द पहिल्यांदा वृत्तपत्रात आल्यापासूनच या शब्दाची खिल्ली उडवली गेली. भारतातसुद्धा प्रबोधनकाळापासून लिंगसमभाव व स्त्रीहक्क याबद्दल बोलणाऱ्यांची खिल्लीच उडवली गेली.
भारतात स्त्रियांनी अंगात ब्लाउज घालावा कि घालू नये, चपला घालाव्या कि घालू नये, इथपासून स्रीप्रश्नाची वाटचाल सुरु होऊन आज खूप मोठा टप्पा गाठला गेला आहे. मागील सत्तर वर्षात स्त्री-शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने सर्व जाती-धर्माच्या तरुणींचा एकमेकींशी संबंध येत गेला आणि स्त्री म्हणून आपण एक शोषित वर्ग असल्याचा भगिनीभाव रुजत गेला. समाजजीवनात वावर वाढल्याने स्त्रीची सामाजिक जाणीव अधिक विस्तारत गेली. पण असे असले तरी बहुतांश शिक्षित महिला संघटितपणे समोर आल्या नाही, चळवळीकडे वळल्या नाही हे सुद्धा तितकेच खरे. स्त्री- लढ्याला चळवळीचे स्वरूप जरी असले तरी स्त्रीला मुख्यत्वाने एकट्यानेच सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर संघर्ष करावा लागला. जमले ते शिक्षण घेऊन मिळाली ती – सरकारी, निमसरकारी, खाजगी, अर्धवेळ अशी नौकरी करत स्त्री संघर्षरत आहे. तिची वैयक्तिक लढाई लढून तिने जे काही मर्यादित स्वरूपाचे यश मिळवले ते सुद्धा सोपे नव्हते.
जेव्हा एखादी नोकरदार स्त्री आपल्या नावाने प्लॉट किंवा सदनिका घेत असते, तेव्हा तो पुरुषसत्तेविरोधात लढा असतो. ती जेव्हा आपली पुरुष सहकाऱ्याला घरी बोलवत असते अथवा त्याच्यासोबत ऑफिस संपल्यावर चहा/कॉफी पिते तेव्हा ती सरळ मनुवादाला आव्हान देत असते. कधी शहरी स्त्री नवऱ्याचा विरोध पत्करून दागिना घेत असते, कधी ग्रामीण स्त्री आपल्या मुलीची प्रसूती रुग्णालयात व्हावी म्हणून घरचा विरोध सहन करून बचत गटाचे कर्ज घेत असते. कधी एखादी महिला सरपंच तिच्या विरोधात आलेल्या अविश्वास ठरावाविरोधात जीव तोडून लढत असते. कधी एखादी महिला सरपंच प्रचंड दडपण येऊनही दारू दुकानाला न हरकत प्रमाणपत्र देत नसते. एखादी महिला वनरक्षक एकट्याने दिवसाला निर्जन जंगलात १०-१२ किमी फिरत असते. महिला पोलीस आणि महिला वैद्यकीय प्रतिनिधी आरोग्याला न झेपणारी १०-१२ तासाची ड्यूटी करत असतात. अनेक तरुणी सिटी बसमध्ये धक्के खात दूरच्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत असतात. हजारो स्त्रिया बदलीच्या गावी जीवघेणा प्रवास रोज करत असतात. त्यांची प्रत्येक कृती पुरुषसत्ताक, मनुवादी वृत्तीच्या विरोधात पुढे टाकलेले एक पाऊल असते. रा. स्व. संघाच्या धुरिणांनी राजकारण हे स्त्रीचे क्षेत्र नव्हे असे सांगितल्यानंतरसुद्धा मनुवादी म्हणवल्या जाणाऱ्या पक्षातील महीला कार्यकर्त्या जेव्हा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी वाड्यावर धाव घेतात तेव्हा सुद्धा तो मनुवाद विरोधी लढाच असतो.
महिला बरेच वेळा आंदोलनात सामील होत नसतात, मोर्चात दिसत नसतात, पण रोज त्या एक लढाई लढत असतात. कधी स्वतः झुकतात, कधी व्यवस्था झुकावतात, कधी माघार घेतात पण हार मनात नसतात. आपला प्रवास एकटीने जमेल तसा, सुचेल तसा पूर्ण करत असतात. ईतर स्त्रियांना शोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, याची या स्त्रियांना जाणीवच नाही असा एक आरोप नेहमी केला जातो जो की मोठ्या प्रमाणात चूक आहे कारण स्त्री हक्क चळवळ मुळातच वेगळ्या पद्धतीने वाटचाल करत आहे. स्त्रीची वैयक्तिक लढाई सामुहिक लढ्याला बळ देते आहे; पुढील पिढीच्या संघर्षाचा मार्ग सुकर करते आहे.
महिला जेव्हा संघटीत लढाई लढतात तेव्हा जीव तोडून लढतात. अत्यंत तुटपुंज्या मानधनात आज या राज्यात दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच हजारो ‘आशा’ वर्कर सेवा देत आहेत आणि सोबतच स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे म्हणून सरकारशी चिवट आणि जीवट लढा देत आहेत. आज महानगरातील मोलकरणी अनेक वर्षांपासून आपले कामगार म्हणून मिळणारे अधिकार आणि आपली माणूस म्हणून असलेली प्रतिष्ठा जपण्यासाठी संघटीत होऊन लढत आहेत. मोलकरणीचा लढा ही तर एक मूक क्रांती आहे…टप्प्याटप्प्याने होणारी.
ईतरही आंदोलनात आज स्त्रिया समोर येत आहेत. विस्थापितांची आंदोलने असोत, नक्षलवादी आंदोलन असो अथवा दारूबंदी आंदोलन असो, अनेक प्रश्नांवर केल्या जाणाऱ्या आंदोलनांचे नेतृत्व स्त्रिया करू लागल्या आणि स्त्रियांच्याच वाढत्या सहभागावर ही आंदोलने टिकून राहिली; पण याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. दुसरीकडे संघटीत आणि उत्साही स्त्री-शक्तीचा गैरवापर केला जातो. राजकीय पक्षांनी आणि पुढारी लोकांनी नसलेली ताकद दाखवण्यासाठी बचत गटाचे दिखाऊ मेळावे घेऊन बचत गट चळवळीचे नुकसानच केले आहे. कधी कधी धार्मिक किंवा प्रतिगामी शक्ती स्त्रियांना वापरून घेतात आणि त्यामुळे स्त्रीहक्क चळवळीचे नुकसान होत असते. शनीच्या चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश मिळालाच पाहिजे, देवळाच्या गाभार्यात स्त्रियांना प्रवेश मिळालाच पाहिजे,पुजारी म्हणून स्त्रियांची नेमणूक करा असे विषय घेऊन स्त्रियांना पुन्हा धार्मिक कर्मकांडात गुंतवून ठेऊन त्यांचा विज्ञानाधिष्ठीत विकास खुंटीत करण्याचे काम आजकाल सुरु झालेले दिसते.
आजकाल महिला दिन साजरा करण्याची एक चाकोरीबद्ध पद्धत तयार झाली आहे. बाईक रॅली, भाषण, मनुवादाचा धिक्कार इथपर्यंतच त्याची व्याप्ती सीमित झाली आहे. नागपुरात दिल्लीतील काही डाव्या महिला संघटनांच्या पुढाकाराने पार पडलेली महिला परिषद हे त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. समाजातल्या सर्व स्तरातल्या महिला एकत्र आणण्याचा हा एक चांगला प्रयोग होता. पण एकत्र आल्यानंतर भाषण, नारेबाजी, गाणे म्हणणे, नाचणे, बाईक रॅली काढणे हे साग्रसंगीत पार पडल्यावर यापुढे काय करायला हवे असा प्रश्न कार्यक्रमात उपस्थित महिलांना नक्कीच पडला असेल. पुढील कुठलाही ठोस कृती कार्यक्रम नसताना असे एक दिवसीय हौशी अधिवेशन घेतल्याने काय साध्य होणार? घोषणा दिल्याने मनुवाद संपणार का?
अनुष्का शर्माचे “ब्रेकप सॉंग” तरुण पिढीत खूप लोकप्रिय आहे – “दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया – मेरे सैयां जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया” असे रिलेशनशिपचा ब्रेकअप सेलीब्रेट करणारे हे गाणे एकवीसव्या शतकातील बदलत्या स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करते. प्रश्न हा आहे की स्त्रीवादी चळवळ बदलते आहे का? ही चळवळ नवीन पिढीला आकर्षित करण्याची ताकद ठेवणार की नुसती मनुवाद आणि पुरुषसत्तेविरोधी नारे देत राहणार? खासकरून महिला दिन साजरा करण्याची परिभाषा बदलण्याची नितांत गरज आहे. पोळ्याला बैल तसे महिला दिनाला महिला असे समीकरण होऊ न देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.
(हा लेख दैनिक सकाळच्या आदिमा या सदराअंतर्गत पूर्वप्रकाशित झाला आहे.)