ती सध्या काय करते ??

बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दरवर्षी आपण वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मुलींचा उंच उडी मारताना चा फोटो बघत असतो. मुलीच अव्वल, यावर्षी मुलींनीच बाजी मारली, अशा बातम्या झळकत असतात. ते बघून मलाही खूप कौतुक वाटत. मागील काही वर्षांची सरासरी बघता प्रत्येक राज्यातून मुलींचीच सर्व शाखांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून पास होण्याचे प्रमाण खूप पटीने वाढले आहे.

एवढ्या सगळ्या हुशार, मेहनती आणि टॉपर मुली आपण बघतो. पण ज्या प्रमाणे मोठ्या हूद्द्यांवर असणारे मुले आपल्याला दिसतात. त्यांच्या तुलनेत मोठ्या हूद्द्यांवर असणाऱ्या मुलींचे प्रमाण खूपच कमी असते. जागतिक पातळीवर केलेल्या अभ्यासावरूनअसे दिसून आले की २००६ मध्ये महिला कामगारांचे प्रमाण ३४ टक्के एवढे होते , व त्यानंतर जेव्हा २०२०मध्ये विश्लेषण केले गेले तेव्हा या प्रमाणात घट होऊन २४.८ टक्के एवढे होते .

मग कुठे जातात या टॉपर मुली ?असा प्रश्न कधी आपल्याला पडतो का?

त्या इकडेच असतात नाती सांभाळत, मुलं सांभाळत, कोणी कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत.

मुलींचे शिक्षण त्यांच्या आई-वडिलांकडे असताना सुरळीत सुरू असतं. पण एकदा लग्न झालं की तेच आई-वडील तिला कुटुंबाकडे लक्ष दे, आता हेच तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे सांगू लागतात. ज्यावेळी मुलासाठी मुलगी शोधणे सुरू करतात त्यावेळी ती इंजिनियर हवी ,एमबीए झालेली हवी, असा अट्टहास असणारे सासू-सासरे ती सून बनल्यावर एकदाही विचारत नाही, की तुला पुढे शिकायची इच्छा आहे का? तुला नोकरी करावीशी वाटते का? त्या शिक्षणाचा उपयोग तू स्वावलंबी बनण्यासाठी करू शकते असे सल्ले कोणीच देत नाही. फक्त आता संसार आणि जबाबदारी हेच तुझे सर्वस्व आहे, असे तिला ठासून सांगितले जाते .

मग या जबाबदारीसाठी कुठलीही डिग्री बघितली जात नसते, तरी पण त्या गोष्टी मध्ये तिने पारंगत असावं अशीच अपेक्षा असते. आज पर्यंत शिक्षण हेच ध्येय असणारी ती मुलगी, आता स्वयंपाक-पाणी, घरातली कामं ,यावरून त्याची पारख होण्यास सुरुवात झालेली असते. मुलींनी शिक्षण घ्यावे ते एक चांगला नवरा मिळवण्यासाठी. त्याच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी बायको बनण्यासाठी याच दृष्टिकोनातून आजवर मुलींच्या शिक्षणाकडे आपल्या समाजाने बघितले आहे. ” नवरा चांगलं कमवतो ना मग तुझ्या नौकरीचा अट्टाहास कशाला ?” असे प्रश्न तिला तिचेच आपले वाटणारे लोक विचारू लागतात. नवऱ्याचे काम पैसे कमावणे व बायकोचे घर सांभाळणे ही समीकरणे आता जुनी झालीत असे आपण ऐकत असतो ,पण प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अजूनही आपला समाज कुठेतरी कच खातो आहे.

“मुलगी शिकली प्रगती झाली ” हे वाक्य कितीही खरे असले तरी ती प्रगती चार भिंतीच्या आत न राहता बाहेरच्या जगात तिची स्वतंत्र ओळख निर्माण करता यावी या दृष्टीने समाजाने प्रयत्नशील असायला हवे .

आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही, या लेखाच्या माध्यमातून मी हेच पोहोचण्याचा प्रयत्न करतेय की समाजाची मानसिकता फक्त मुली शिकण्यापुरती मर्यादित न ठेवता त्या मुलींना एक स्वावलंबी स्त्री होण्यासाठी प्रोत्साहित करावे, व ते स्वावलंबन वर्ष -दोन वर्ष न राहता ते कायमस्वरूपी तीने अंगीकारावे. किंबहुना तिला कुटुंबाने व समाजाने त्यासाठी पाठिंबा द्यावा. तेव्हाच या हुशार असणाऱ्या मुली आपल्या समाजात उच्च स्थानी बघायला मिळतील व त्या तिथे ही आपली कार्यक्षमता सिद्ध करू शकतील.

About the Author

Share this on: